पुणे :



प्रशासकीय कारणास्तव लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल ३२ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून या निर्णयामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्याने संबंधित ठाण्याच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (दि. १८) रात्री उशिरा परिपत्रकाद्वारे जारी केले. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (एन) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
या आदेशानुसार ३ सहायक फौजदार, १० पोलीस हवालदार आणि १९ पोलीस अंमलदार अशा एकूण ३२ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले असून, नव्या ठिकाणी रुजू झाल्याचा अनुपालन अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, बहुसंख्य कर्मचाऱ्यांची बदली लोहगाव, विमानतळ, चंदननगर आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यांकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोहगाव व विमानतळ पोलीस ठाण्यांकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हलविण्यात आले आहे.
यामधील इंद्रजीत डाडर या कर्मचाऱ्याची बदली वैद्यकीय व कौटुंबिक अडचणीमुळे विनंतीनुसार करण्यात आल्याचे समजते.
बदल्यांमागे नेमके कारण काय?
एकाच ठाण्यातील एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या झाल्याने पुणे शहर पोलीस दलात चर्चांना उधाण आले आहे. काही जण हा निर्णय नियमित प्रशासकीय प्रक्रिया मानत असले तरी, अचानक झालेल्या या मोठ्या फेरबदलामागील कारणांविषयी विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
या बदल्यांमुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कारभाराची घडी विस्कळीत होणार का, तसेच नव्या मनुष्यबळासह संबंधित ठाण्यांची कार्यपद्धती कशी राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

















