पालखी सोहळ्यापूर्वी विश्रांतवाडी उड्डाणपूल पूर्ण होणार का? कामाच्या संथगतीमुळे नागरिकांमध्ये चिंता

पुणे :

विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल व समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) प्रकल्पाच्या कामाला अद्यापही अपेक्षित गती मिळालेली नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मार्ग याच चौकातून जात असल्याने, सोहळ्यापूर्वी काम पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाहतूक कोंडी, पर्यायी मार्गांची कमतरता, तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. चौकातील सततची वर्दळ लक्षात घेता कामासाठी वेळेची बंधने येत असून, त्यामुळे उर्वरित कामे पूर्ण करण्यास विलंब होत असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

६३ कोटींचा ‘वाय’ आकाराचा प्रकल्प

चौकातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने ६३ कोटी रुपये खर्चून ‘वाय’ आकाराचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. २०२४ मध्ये या प्रकल्पास सुरुवात झाली. आतापर्यंत सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, विमानतळाकडून विश्रांतवाडी चौकाकडे येणाऱ्या पुलाचे तसेच समतल विलगकाचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले आहे. मात्र आळंदी व लोहगावकडील भागातील उर्वरित काम अजून बाकी आहे.

पालखी मार्गामुळे वाढलेले महत्त्व

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून विश्रांतवाडीमार्गे पुणे शहराकडे प्रस्थान करते. लाखो वारकरी या मार्गाने पंढरपूरकडे जात असल्याने, चौकातील काम वेळेत पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. अन्यथा वाहतूक व वारकऱ्यांच्या हालचालींमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

एकूण लांबी : ६३०.१२ मीटर

एकूण रुंदी : ७ मीटर

आळंदी बाजूचा पूल : १९७.१२ मीटर

लोहगाव बाजूचा पूल : १४२ मीटर

दरम्यान, पालखी सोहळ्यापूर्वी किमान मुख्य मार्गावरील काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष प्रगती पाहता नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे.

आणखी वाचा   पाषाण तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवा