पुणे :



उन्हाळ्याच्या सुट्टीत वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातून धावणाऱ्या काही विशेष गाड्यांच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खडकी–हिसार, दौंड–अजमेर आणि सोलापूर–अजमेर या साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली असून, अतिरिक्त फेऱ्यांचीही घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खडकी–हिसार साप्ताहिक विशेष गाडीला ५ अतिरिक्त फेऱ्या
गाडी क्रमांक ०४७२५ (हिसार–खडकी) ही गाडी पूर्वी २२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत धावणार होती. आता ती २९ मार्च २०२६ पर्यंत दर रविवारी धावणार असून, या कालावधीत ५ अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत.
तसेच गाडी क्रमांक ०४७२६ (खडकी–हिसार) ही गाडी २३ फेब्रुवारीऐवजी ३० मार्च २०२६ पर्यंत दर सोमवारी धावेल. या मार्गावरही ५ अतिरिक्त फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे.
दौंड–अजमेर साप्ताहिक विशेष गाडीची मुदत वाढ
गाडी क्रमांक ०९६२५ (अजमेर–दौंड) ही गाडी २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत धावणार होती. आता ती २६ मार्च २०२६ पर्यंत दर गुरुवारी धावणार असून, या दरम्यान ४ अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक ०९६२६ (दौंड–अजमेर) ही गाडी २७ फेब्रुवारीऐवजी २७ मार्च २०२६ पर्यंत दर शुक्रवारी धावणार आहे.
सोलापूर–अजमेर विशेष गाडीला ४ अतिरिक्त फेऱ्या
गाडी क्रमांक ०९६२७ (अजमेर–सोलापूर) ही गाडी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत नियोजित होती. आता ती २५ मार्च २०२६ पर्यंत दर बुधवारी धावणार असून, या कालावधीत ४ अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे उन्हाळी सुट्टीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार असून, गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे. प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाची नोंद घेऊन आरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

















