वाहतूक नियमभंगावर मोठी कारवाई

* पुणे आरटीओकडून ३,६०० परवाने निलंबित

पुणे :

शहरातील वाढत्या वाहतूक नियमभंगाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. गेल्या वर्षभरात विविध गंभीर उल्लंघनांमुळे तब्बल ३ हजार ६०० वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. पुढील काही दिवसांत आणखी परवान्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, क्षमतेपेक्षा जादा माल वाहून नेणे, दारू अथवा अमली पदार्थांच्या सेवनानंतर वाहन चालविणे, तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित परवाना असताना वाहन चालविल्यास कडक दंड

आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या चालकाचा परवाना निलंबित झाला आहे आणि तो वाहन चालविताना आढळला, तर त्याच्यावर विनापरवाना वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल करून ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.

निलंबनाची नोंद आरटीओच्या ऑनलाईन प्रणालीत होत असल्याने चालकाकडे परवाना प्रत्यक्षात असला तरी यंत्रणेत तो अमान्य म्हणून दर्शविला जातो. अशा स्थितीत संबंधित चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई अपरिहार्य ठरते.

अपघात झाल्यास विमा अमान्य

निलंबित परवाना असताना वाहन चालविताना अपघात झाल्यास संबंधित वाहनाचा विमा दावा ग्राह्य धरला जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नियमभंगाचे परिणाम अधिक गंभीर ठरू शकतात.

रस्ते सुरक्षेला प्राधान्य

महामार्ग पोलिस, वाहतूक शाखा आणि इतर राज्यांतील अहवालांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत परवाना निलंबनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, रस्ते सुरक्षा हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने कठोर कारवाई केली जाईल.

आणखी वाचा   पेशवे पार्कच्या शिवसृष्टीवरुन शिवसेनेचा भाजपविरोधी निषेध