महापौरपद इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होण्याची शक्यता

* इच्छुकांमध्ये हालचालींना वेग

पुणे :

पुणे महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापौरपदावर इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटासाठी आरक्षण पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी पंचवार्षिक कार्यकाळात खुला गट वगळून आरक्षण जाहीर होणार असल्याने, ओबीसी आरक्षणाच्या शक्यतेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः महिला आरक्षण लागू झाल्यास अनेक इच्छुकांच्या आशा मावळण्याची चिन्हे आहेत.

मागील पंचवार्षिक कार्यकाळात महापौरपद खुल्या गटासाठी राखीव होते. त्यामुळे भाजपकडून दिवंगत मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहोळ यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. यंदा मात्र आरक्षण बदलणार असल्याने समीकरणे पूर्णपणे वेगळी ठरणार आहेत. निवडणूक निकालाआधीच अनेक नगरसेवकांनी ‘भावी महापौर’ म्हणून तयारी आणि प्रचार सुरू केला होता. मात्र, ओबीसी आरक्षण निश्चित झाल्यास ही स्पर्धा मर्यादित होणार आहे.

राज्यभरातील महापालिकांतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेसाठी इतर मागासवर्गीय गटासाठी आरक्षण पडल्यास, त्या गटातीलच नगरसेवकांमधून महापौरपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल. यामध्ये महिलेसाठी आरक्षण लागू झाल्यास, पक्षाला महिला नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या चर्चेमुळे भाजपमधील इच्छुक नगरसेवकांचे लक्ष आता सोडतीकडे लागले आहे. आरक्षण स्पष्ट होताच महापौरपदाच्या शर्यतीतील चित्र स्पष्ट होणार असून, तोपर्यंत राजकीय हालचाली आणि चर्चांना अधिकच वेग येण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा   माजी उपमहापौर आबा बागुल यांचा शिवसेनेत प्रवेश