पुणे :



नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत मुळशी तालुक्याच्या विविध गावांतील उमेदवारांनी उल्लेखनीय यश मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मुळशीकरांनी यावेळी एकूण सहा जागांवर विजय मिळविला असून, त्यापैकी चार नगरसेवक भाजपकडून, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेत मुळशी तालुक्याचे प्रतिनिधित्व सातत्याने कायम असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे बाबूराव चांदेरे यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवत विक्रम केला आहे. तर भाजपचे किरण दगडेपाटील, दिलीप वेडेपाटील आणि अल्पना वरपे यांनी दुसऱ्यांदा नगरसेवकपदाची संधी मिळवली. भाजपच्या रूपाली पवार आणि काँग्रेसच्या दीपाली डोख या प्रथमच महापालिकेत दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे काही प्रभागांमध्ये मुळशीकर विरुद्ध मुळशीकर अशी थेट लढतही पुणेकरांना पाहायला मिळाली.
कोथरूड, कर्वेनगर, वारजे माळवाडी, बावधन, पौड फाटा, नळस्टॉप या भागांमध्ये मुळशी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. नोकरी, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत या नागरिकांनी राजकारणातही भक्कम स्थान मिळवले आहे. विविध पक्षांमध्ये सक्रिय भूमिका बजावत सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांमधून त्यांनी पुणेकरांचा विश्वास संपादन केला. याच परंपरेतून पुणे महापालिकेत मुळशीकरांचा झेंडा सातत्याने फडकत राहिला आहे.
याच महापालिकेतून मुठा भागातील मुळशीकर मुरलीधर मोहोळ यांनी नगरसेवक, महापौर, खासदार ते केंद्रीय मंत्री असा यशस्वी प्रवास केला आहे. केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचलेले ते पहिले मुळशीकर ठरले आहेत. यंदाच्या निवडणुकीतील यशामुळे पुण्याच्या राजकारणात मुळशी तालुक्याचा प्रभाव भविष्यातही कायम राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

















