* पती-पत्नी, भाऊ-भाऊ, सासू-सून सभागृहात



पुणे :
पुण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. अनेक महानगरपालिकांमध्ये भाजपने जोरदार विजय मिळवत सत्ता प्रस्थापित केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटालाही उल्लेखनीय यश मिळाले आहे. मात्र या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटासह मनसेला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या निवडणूक निकालात यंदाही एकाच घरातील एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून येण्याची परंपरा कायम राहिली आहे. पती-पत्नी, दोन सख्खे भाऊ तसेच सासू-सून अशा नातेसंबंधातील उमेदवार थेट सभागृहात पोहोचल्याने महापालिकेतील ‘घराणेशाही’ पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रभाग क्रमांक ३ (विमाननगर-लोहगाव) मधून भाजपच्या ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, तर प्रभाग क्रमांक ४ (खराडी-वाघोली) मधून भाजपचे सुरेंद्र पठारे विजयी झाले आहेत. त्यामुळे पती-पत्नी एकाच वेळी महापालिकेच्या सभागृहात दिसणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते दीपक मानकर यांच्या कुटुंबालाही यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर) मधून हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादीकडून विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक २५ (महात्मा फुले मंडई) मधून भाजपचे राघवेंद्र मानकर निवडून आले आहेत. त्यामुळे दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या पक्षांतून सभागृहात पोहोचले आहेत.
प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ-नाना पेठ) मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सोनाली आंदेकर (‘अ’ विभाग) आणि लक्ष्मी आंदेकर (‘ब’ विभाग) या सासू-सून जोडीने विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयामुळे या प्रभागाचा निकाल विशेष चर्चेत आला आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १० (बावधन-भुसारी कॉलनी) मधून कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांचा पराभव झाला आहे. तसेच प्रभाग क्रमांक ३९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढविणारे बापू नायर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
एकूणच, पुणे महापालिकेच्या निकालात राजकीय पक्षांच्या यशापयशाबरोबरच कुटुंबीयांचे राजकारण आणि घराणेशाही हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
















