महापालिका निवडणुकीत पक्षभेद बाजूला; ‘काम करणाऱ्या’ उमेदवारालाच पसंती

पुण्यातील परराज्यातील मतदारांचा सूर

पुणे –

लोकसभा व विधानसभा निवडणुकांपेक्षा महापालिका निवडणुका वेगळ्या निकषांवर ठरतात. रोजच्या जीवनाशी थेट संबंधित प्रश्न सोडवणारा, अडचणीच्या वेळी तत्काळ मदतीला धावणारा आणि स्थानिक पातळीवर प्रभावी काम करणारा उमेदवारच आमच्या मतदानाचा केंद्रबिंदू असेल, अशी स्पष्ट भूमिका पुण्यात दीर्घकाळापासून वास्तव्यास असलेल्या परराज्यातील नागरिकांनी मांडली आहे. पक्षीय ओळखीपेक्षा उमेदवाराची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता महत्त्वाची ठरणार आहे.

व्यवसाय, उद्योग आणि सेवाक्षेत्राच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांतून हजारो नागरिक पुण्यात स्थायिक झाले आहेत. हॉटेल, मिठाई, किराणा, हार्डवेअर, फर्निचर आदी विविध व्यवसायांमध्ये या नागरिकांचा मोठा वाटा असून, त्यांच्या कुटुंबांची दुसरी पिढीही आता या व्यवसायांत सक्रिय होत आहे. त्यामुळे शहराच्या विकासाशी त्यांचे नाते अधिक घट्ट झाले असून, महापालिका निवडणुकीत मतदान करण्याला ते विशेष प्राधान्य देत आहेत.

जिल्ह्यात आठ ते दहा लाखांच्या घरात राजस्थानी समाजाचे वास्तव्य असून, त्यातील सुमारे पाच लाख नागरिक पुणे शहरात राहतात. यंदा सुमारे एक लाख ७० हजार राजस्थानी मतदार महापालिका निवडणुकीत मतदान करणार आहेत. तसेच दक्षिण भारतातून आलेल्या, विशेषतः दक्षिण कन्नड भागातील एक लाखांहून अधिक मतदार पुण्यात स्थायिक असून, त्यांचाही निवडणूक निकालांवर प्रभाव राहणार आहे.

राजस्थानी समाजाचे प्रतिनिधी सुनील गेहलोत यांनी सांगितले की, “पुण्यात आमची कुटुंबे दोन पिढ्यांपासून व्यवसायासाठी स्थायिक आहेत. स्थानिक पातळीवर व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी कोण सोडवतो, हे पाहूनच आम्ही उमेदवार निवडतो.”

तर बंट संघ गौरव समितीचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी समाजातील नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आल्याचे सांगितले.

दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांकडून मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी विशेष सवलती देण्यात येणार आहेत. लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने ही उपक्रम राबविण्यात येत असल्याचे हॉटेल व्यावसायिक संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

आणखी वाचा   नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू