* पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण पोलिस दलात १०० ‘डोमिनार ४००’ अत्याधुनिक मोटरसायकली दाखल



पुणे :
वेगाने विस्तारत असलेल्या शहरी व ग्रामीण भागांतील कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधा असलेल्या १०० ‘डोमिनार ४००’ मोटरसायकली दाखल करण्यात आल्या आहेत. या नव्या मोटरसायकलींमुळे पोलिसांच्या गस्त क्षमतेसह आपत्कालीन प्रतिसाद वेळेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.
जगातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटो लिमिटेड निर्मित ‘डोमिनार ४००’ या विशेष पोलीस मॉडेल मोटरसायकली शहरी वाहतूक कोंडी, ग्रामीण दुर्गम भाग तसेच उच्च जोखमीच्या परिस्थितीत प्रभावी कामगिरी करण्यासाठी खास डिझाइन करण्यात आल्या आहेत. मजबूत अभियांत्रिकी आणि शक्तिशाली ३७३.३ सीसी लिक्विड-कूल्ड इंजिनमुळे या मोटरसायकली पोलिसांच्या दैनंदिन व आपत्कालीन कर्तव्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
गस्त व आपत्कालीन प्रतिसादात वाढ
नव्या मोटरसायकलींच्या समावेशामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिस विभागांच्या गस्त क्षमतेत मोठी झेप घेता येणार असून, घटनास्थळी जलद पोहोचणे शक्य होणार आहे. हाय-स्पीड पाठलाग, वाहतूक नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी या बाइक्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
सुरक्षेसाठी प्रगत सुविधा
‘डोमिनार ४००’ पोलीस मॉडेलमध्ये एलईडी आपत्कालीन दिवे, सायरन, सार्वजनिक घोषणा प्रणाली, पुश-टू-टॉक रेडिओ, ड्युअल-चॅनल एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, जीपीएस ट्रॅकिंग, मोबाईल व वॉकी-टॉकी चार्जिंग पॉइंट्स, आपत्कालीन प्रथमोपचार किट तसेच कुलूपबंद साइड पॅनियर्स व टॉप बॉक्स अशा अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

















