पुणे :



पुण्यातील एका आत्महत्येच्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याप्रकरणी आधीच गुन्हा दाखल असलेले आणि सध्या अंतरिम जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारूक इनामदार यांनी आता थेट काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांच्यावर आरोप केले आहेत.
पुण्यातील कॅम्प परिसरात राहणाऱ्या ५६ वर्षीय सादिक कपूर यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात फारूक इनामदार यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. खंडणी आणि जागेच्या व्यवहारातून मानसिक तणाव वाढल्याने सादिक कपूर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती तपासात समोर आली होती. आत्महत्येपूर्वी सादिक कपूर यांनी सुसाईड नोट लिहिली होती तसेच हातावरही एका आरोपीचे नाव लिहिल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
दरम्यान, सादिक कपूर यांनी आत्महत्येपूर्वी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांना कुरिअरद्वारे एक पत्र पाठवले होते. या पत्रात स्थानिक टोळी आणि जमिनींच्या व्यवहारांबाबत गंभीर आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.
न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर फारूक इनामदार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत प्रशांत जगताप यांच्यावर पलटवार केला आहे. आत्महत्येच्या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा करत, हे आरोप राजकीय आकसातून करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीतील राजकीय मतभेदांमुळे आपल्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून, पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपासातून कोणते नवे धक्कादायक तथ्य समोर येते, याकडे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

















