महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आरोप–प्रत्यारोप तीव्र

* आ. रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

पुणे –

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा नियोजनबद्ध विकास न होता शहरांची घडी विस्कटली गेली असून, याला भाजपची सत्ताकाळातील कार्यपद्धती जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे निवडणूक प्रभारी व आमदार रोहित पवार यांनी केला. आगामी महापालिका निवडणुकीत पराभवाची भीती भाजप नेत्यांना सतावत असल्यानेच आरोपांची धार वाढल्याचा दावाही त्यांनी केला.

वारजे येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना रोहित पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेची झोड उठवली. शहरातील विविध विकास प्रकल्पांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत, काही प्रकल्पांना अडथळे आणण्याचे प्रकार वाढल्याचे त्यांनी सांगितले. “कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. व्यवसायिकांना फोन करून दबाव टाकण्याच्या तक्रारी समोर येत आहेत,” असे ते म्हणाले.

पासपोर्ट प्रकरणावरून वाद

नीलेश घायवळ याला पासपोर्ट देण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना रोहित पवार यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देण्याऐवजी या प्रकरणावर थेट चर्चा करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

वादग्रस्त वक्तव्यांवर नाराजी

यावेळी त्यांनी भाजप नेते महेश लांडगे यांच्या भाषणातील काही वक्तव्यांवरही टीका केली. संबंधित वक्तव्यांमधून महिलांविषयी अवमानकारक सूर दिसून येतो, असे सांगत त्यांनी या भूमिकेचा निषेध केला.

आणखी वाचा   वडगाव शेरीत शिवसेना शिंदे जागा द्यावी: - उध्दव गलांडे