शाळांमध्ये ‘नोडल अधिकारी’ नियुक्तीचा निर्णय वादात

* भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणाची जबाबदारी शिक्षकांवर; संघटनांचा तीव्र विरोध

पुणे :

राज्यातील शिक्षक आधीच विविध शिक्षणबाह्य कामांच्या ओझ्याखाली दबलेले असताना आता त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी टाकण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील प्रत्येक शाळेत परिसर स्वच्छता व सुरक्षेसाठी एका शिक्षकाची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून, शाळा परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्याची जबाबदारीही संबंधित शिक्षकावर सोपविण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, परिपत्रक मागे न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
देशभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांच्या परिसरात स्वच्छता व सुरक्षितता राखण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ‘नोडल अधिकारी’ नेमण्याचे आदेश दिले. त्याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेही हे परिपत्रक जारी केले आहे.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या आदेशानुसार, प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती होणार आहे. त्या शिक्षकाचे नाव व संपर्क क्रमांक शाळेच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे लावणे, तसेच स्थानिक महापालिका किंवा संबंधित प्रशासकीय यंत्रणेला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळेच्या आवारात भटकी कुत्री शिरू नयेत किंवा त्यांचा तिथे निवारा होऊ नये, याची देखरेख करण्याची जबाबदारीही या शिक्षकावर देण्यात आली आहे.
या निर्णयावर शिक्षक संघटनांनी कडाडून टीका केली आहे. शालेय परिसराची स्वच्छता, देखभाल व भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असून, प्रशासनातील त्रुटी झाकण्यासाठी शिक्षकांवर शिक्षणाशी असंबंधित कामे लादली जात असल्याचा आरोप शिक्षक संघाचे (संभाजीराव गट) जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी केला आहे. आदेश तातडीने मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. एकीकडे शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी करण्याची घोषणा केली जाते, तर दुसरीकडे अशा नव्या जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांना अध्यापनापासून दूर नेले जात असल्याची भावना संघटनांनी व्यक्त केली आहे. कोरोना काळात विविध शासकीय कामांसाठी शिक्षकांना जुंपण्यात आले होते, आता भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणाची जबाबदारी देण्यात येत असल्याने ‘उद्या आम्हाला वन्यप्राण्यांनाही हुसकावण्यास सांगितले जाईल का?’ असा संतप्त सवालही शिक्षक नेत्यांनी उपस्थित केला आहे.
शालाबाह्य कामांसाठी नेहमीच शिक्षकांनाच लक्ष्य केले जात असल्याची खंत व्यक्त करत संघटनांनी, शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ कामाकडे लक्ष देऊ द्यावे, अशी ठाम मागणी केली आहे.

आणखी वाचा   वाढत्या भटक्या श्वानांमुळे शहर असुरक्षित; हल्ल्यांच्या घटनांत लक्षणीय वाढ