पीएमपी बस प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कडक पावले

* चालकांसाठी नवी नियमावली लागू

पुणे :

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अलीकडील काळात पीएमपीएमएलच्या भाडेतत्त्वावरील बसच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, बस चालकांसाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. अपघात रोखणे, प्रवाशांचे प्राण सुरक्षित ठेवणे आणि महामंडळाची प्रतिमा सुधारणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
पीएमपी प्रशासनाने चालकांना सुरक्षित वाहतूक, वेग नियंत्रण आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करत बस चालविणाऱ्या चालकांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई केवळ महामंडळाच्या चालकांपुरती मर्यादित नसून, सर्व ठेकेदारांच्या चालकांनाही ती तितकीच लागू असेल. निष्काळजी चालकांसोबतच संबंधित ठेकेदारांवरही कठोर पावले उचलली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अपघातांचे प्रमाण वाढल्याने भाडेतत्त्वावरील बस चालकांना शिस्त लावणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे सर्व आगार व्यवस्थापकांना दर आठवड्याला चालकांचे प्रबोधन व समुपदेशन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिली.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या उपाययोजना :
दर आठवड्याला आगार पातळीवर दोन्ही शिफ्टमधील चालकांसाठी ‘गेट मीटिंग’ घेऊन सुरक्षित प्रवासाबाबत मार्गदर्शन
बसस्थानके, भाजी मंडई, सिग्नल, चौक आणि पादचारी मार्गांजवळ बसचा वेग मर्यादित ठेवणे
पीएमपी बस ताशी ६० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने धावण्यास सक्त मनाई
वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी बस डाव्या बाजूच्या लेनमधूनच चालविण्याच्या सूचना
बीआरटी मार्गातील पंक्चर चौक व उड्डाणपुलाजवळील सेवा रस्त्यांवर विशेष खबरदारी
दरम्यान, डिसेंबर महिन्यात पीएमपीच्या ४५९ तर भाडेतत्त्वावरील तब्बल ९०७ बस बंद राहिल्याची आकडेवारी समोर आली असून, ही बाबही प्रशासनासाठी चिंतेची ठरली आहे. प्रवाशांचा विश्वास टिकवण्यासाठी आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून पुढील काळात आणखी कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा   भाजपची ‘मिशन महापालिका’ रणनीती वेगात