हडपसर–दिवेघाट प्रवासाला नवी गती; अवघ्या २० ते २५ मिनिटांत सासवड गाठणे शक्य

पुणे :

हडपसर ते सासवड या मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक घडामोड घडत असून, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवेघाट हा महत्त्वाचा टप्पा झपाट्याने विस्तारीत केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे येत्या काळात हा प्रवास केवळ वीस ते पंचवीस मिनिटांत पूर्ण होणार आहे.

सध्या दोन मार्गिकांचा असलेला हा रस्ता भविष्यात तब्बल आठ मार्गिकांचा होणार असून, पुढील पन्नास वर्षांचा वाहतुकीचा विचार करून ही रचना करण्यात येत आहे. विशेषतः दिवेघाट परिसरात दोन्ही बाजूंनी एकूण सहा मार्गिकांचे काम सुरू असून, डोंगराळ भागामुळे हे काम आव्हानात्मक असतानाही प्राधिकरणाने ते वेगाने पुढे नेले आहे.

हडपसर ते दिवेघाट हा सुमारे १३.२५ किलोमीटर लांबीचा टप्पा पूर्वी अरुंद असल्याने येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असे. आषाढी वारीदरम्यान पालखीसोबत चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता हा मार्ग विस्तारीकरणाच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असून, वारकरी आणि वाहनचालक दोघांसाठीही तो अधिक सुरक्षित ठरणार आहे.

या प्रकल्पांतर्गत दोन्ही बाजूंनी सेवा रस्त्यांची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी व दुकानदारांना स्वतंत्र वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मंतरवाडी ते साडी सेंटरदरम्यान सुमारे एक किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला जात असून, वडकी, उरुळी देवाची, फुरसुंगी आदी ठिकाणी भुयारी मार्गांचे कामही प्रगतीपथावर आहे. फुरसुंगी येथील रेल्वे उड्डाण पुलाचे विस्तारीकरणही अंतिम टप्प्यात आले आहे.

प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या पार्श्वभूमीवर या मार्गाचे महत्त्व अधिक वाढले आहे. भविष्यात पुरंदर, सोलापूर आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने हा रुंद व दर्जेदार महामार्ग प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करणार आहे. दिवेघाटातील धोकादायक वळणे कमी करून अपघाताचा धोका कमी करण्यावरही भर देण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सध्या सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी किमान दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. २०२६ च्या पालखी सोहळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण करून वारकऱ्यांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित मार्गिका उपलब्ध करून देण्याचा मानस प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.

आणखी वाचा   पीएमपी बसमध्ये महिलांचा अपमान करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुदामे याला ५० हजारांचा दंड