पुण्यात महापौर शिवसेनेचाच

*  १६ तारखेला खरी ताकद दिसेल

– उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे :

पुण्याचा महापौर ठरवताना शिवसेनेला दुर्लक्ष करून कोणताही निर्णय होऊ शकत नाही, असा ठाम इशारा उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिला. पुणे महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

सामंत म्हणाले की, पुण्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच शिवसेना तब्बल १२० जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवसेनेला कमी लेखण्याची चूक कोणीही करू नये. एक जागा पन्नास कशा होतात, हे १६ तारखेलाच संपूर्ण शहर पाहणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेला उमेदवार मिळणार नाहीत, असे बोलले जात होते; मात्र वेळ मिळाला असता १६५ उमेदवार सहज उभे केले असते, असे सांगत त्यांनी पक्षाची ताकद अधोरेखित केली. आगामी तेरा दिवसांत आक्रमक, पण सकारात्मक प्रचार करा आणि विकास हाच एकमेव मुद्दा ठेवा, असा संदेश त्यांनी शिवसैनिकांना दिला.

संपूर्ण पुण्यात भगवे वातावरण निर्माण झाले असून कसबा गणपती आणि दगडूशेठ गणपती शिवसेनेवर संकट येऊ देणार नाहीत, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. धनुष्यबाणाच्या चिन्हामागे जनता ठामपणे उभी राहते, असे सांगत त्यांनी उमेदवारांना प्रचारात उतरायला आवाहन केले.

चांदणी चौक, नवले पूल यांसारख्या वाहतूक समस्यांपासून कात्रज विकास आराखडा व उपनगरांतील विकासकामांपर्यंत केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच ठोस काम होऊ शकते, असे सामंत म्हणाले.

प्रचार शुभारंभासाठी रात्री उशिरा हजारो शिवसैनिकांची उपस्थिती ही फक्त सुरुवात असून, खरी ताकद निकालाच्या दिवशी दिसेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

ही निवडणूक शिवशक्ती आणि जनशक्तीची असून, विकासाच्या मुद्द्यावरच जनतेपर्यंत पोहोचायचे आहे, असा स्पष्ट संदेश देत सामंत यांनी महायुतीत कोणताही तणाव निर्माण होईल अशी भूमिका घेऊ नये, असेही आवाहन केले.

आणखी वाचा   भाजपमध्ये तिकीट वाटपाने पुण्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केला उघड उघड संताप व्यक्त