सनसिटी–माणिकबागमध्ये भाजपचा निर्विवाद विजय

* मंजुषा नागपुरे, श्रीकांत जगताप बिनविरोध

पुणे :

महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आणखी एक यश मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी–माणिकबाग येथून भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, हे दोघेही सलग तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले होते.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान मंजुषा नागपुरे यांच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले होते. काही नेत्यांकडून त्यांची उमेदवारी कापण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा होती. मात्र पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात त्यांचे नाव आघाडीवर राहिले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याने अखेर उमेदवारी कायम ठेवण्यात आली.

प्रभागात विरोधकांकडून उमेदवार न उभा राहिल्याने दोन्ही भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आले. या विजयामुळे सनसिटी–माणिकबाग परिसरात भाजपचा दबदबा अधिक दृढ झाल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या विश्वासामुळेच हा निर्विवाद विजय मिळाल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

आणखी वाचा   राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून बंडू आंदेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार