एबी फॉर्मवरून उमेदवारांमध्ये गदारोळ

*उमेदवाराने प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म चावून गिळला

पुणे :

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असतानाच पुण्यात शिवसेनेतील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. उमेदवारीच्या अधिकृत एबी फॉर्मवरून शिवसेनेच्या दोन उमेदवारांमध्ये तीव्र वाद झाला असून, या वादाचे रूपांतर थेट पोलिस कारवाईत झाले आहे. या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत चर्चा रंगू लागली आहे.
धनकवडी–सहकारनगर परिसरातील वॉर्ड कार्यालयात हा प्रकार उघडकीस आला. वॉर्ड क्रमांक ३४ साठी पक्षाकडून दोन जणांना एबी फॉर्म मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला. याच कारणावरून उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वाद इतका वाढला की एका उमेदवाराने प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म जबरदस्तीने काढून घेत त्याची नासधूस केली व फाडून चावून गिळला असा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर संबंधित उमेदवाराविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अधिकृत कामात अडथळा आणणे आणि महत्त्वाच्या शासकीय दस्तऐवजाशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू असून, सर्व बाजू तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, एबी फॉर्म हे उमेदवारीची अधिकृत ओळख मानले जात असल्याने त्याबाबत कोणतीही चूक अथवा गोंधळ निवडणूक प्रक्रियेसाठी गंभीर ठरतो. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक शिस्तीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, अंतर्गत मतभेद सार्वजनिक पातळीवर येणे पक्षासाठी अडचणीचे ठरू शकते, अशी प्रतिक्रिया राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. निवडणुकीच्या तणावपूर्ण वातावरणात अशा घटनांमुळे मतदारांमध्येही संभ्रम वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा   शिवसेना ‘मोठा भाऊ