रुबी हॉल किडनी रॅकेटचा पर्दाफाश; ४७० पानी अहवाल सादर

पुणे :

रुबी हॉल क्लिनिकमध्ये उघडकीस आलेल्या अवैध किडनी (मूत्रपिंड) प्रत्यारोपण प्रकरणाची सखोल चौकशी करणाऱ्या दहा सदस्यीय समितीने तब्बल ४७० पानांचा अहवाल राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सादर केला आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करण्यात आली असून, अहवालातून किडनीदाता आणि किडनी स्वीकारणाऱ्या व्यक्तीतील नातेसंबंध बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषी व्यक्तींची नावे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ पासून या प्रकरणाच्या चौकशीस सुरुवात केली होती. चौकशीदरम्यान अमित अण्णासाहेब साळुंखे हे किडनी स्वीकारणारे असून, त्यांची पत्नी म्हणून दाखविण्यात आलेली व्यक्ती प्रत्यक्षात बनावट असल्याचे निष्पन्न झाले. किडनीदाता म्हणून सारिका गंगाराम सुतार यांचे नाव समोर आले आहे. ठरलेली आर्थिक रक्कम न मिळाल्याने किडनीदात्याच्या बहिणीने पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून रुग्णालयातील हालचाली थांबवल्याची माहितीही अहवालात नमूद करण्यात आली आहे.

* सर्व बाजूंची कसून चौकशी

या चौकशी समितीने शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापन, बनावट कागदपत्रे तयार करणारे कर्मचारी व एजंट, किडनीदाता, किडनी स्वीकारणारा रुग्ण, तसेच स्टेट ऑथरायझेशन समिती, ससून रुग्णालय, गुन्हे शाखा आणि तक्रारदार यांची सविस्तर तपासणी व उलटतपासणी केली आहे. यासोबतच यापूर्वी नेमण्यात आलेल्या चार सदस्यीय समितीतील चौकशी अधिकाऱ्यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

* कारवाईच्या प्रतीक्षेत

२४ डिसेंबर रोजी चौकशी समितीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन हा सविस्तर अहवाल सादर केला. अहवालाच्या आधारे पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन दोषींवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या गाजलेल्या किडनी रॅकेट प्रकरणात मोठी कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.

आणखी वाचा   बिबवेवाडीत भीषण दुर्घटना