नाना पेठेतील टोळीयुद्धातून थेट राजकारणात प्रवेश

* आयुष कोमकरच्या आईचा निवडणूक लढवण्याचा निर्धार; पुण्याची राजकीय पटलावर खळबळ

पुणे :

नाना पेठ व रविवार पेठ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला आंदेकर–कोमकर वाद आता थेट राजकीय रणांगणात उतरला आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर १९ वर्षीय आयुष कोमकरची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेनंतर, आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत उतरायचा निर्णय घेतला असून, त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

न्यायासाठी राजकीय लढाई

गेल्या वर्षी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नाना पेठेत गोळीबार व कोयत्याने हल्ला करून वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची त्यानंतर हत्या झाल्याचा आरोप आंदेकर समर्थकांवर करण्यात येतो.

या पार्श्वभूमीवर कल्याणी कोमकर यांनी “मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि परिसरातील दहशत संपवण्यासाठी राजकारणात उतरत आहे,” असे स्पष्ट केले.

रक्ताच्या नात्यातील संघर्ष

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे बंडू आंदेकर हे कल्याणी कोमकर यांचे वडील आहेत. मात्र, रक्ताच्या नात्यालाही या संघर्षाने छेद दिला आहे. “माझ्या मुलाच्या हत्येमागे माझ्याच वडिलांचा कट आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

आंदेकर कुटुंबाने विकासाच्या नावाखाली अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत, “असा विकास समाजासाठी घातक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

उमेदवारीवरून इशारा

कल्याणी कोमकर यांनी प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ–नारायण पेठ) मधून शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी मागितली आहे. तसेच, कोणत्याही परिस्थितीत आंदेकर कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. आंदेकरांना राजकीय पाठबळ मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

आणखी वाचा   एक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीला गती