शिवसेना ‘मोठा भाऊ

* ७० टक्के जागांवर दावा – वसंत मोरे

पुणे :

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. युतीत ‘मोठा भाऊ कोण?’ या प्रश्नावर सुरू असलेल्या चर्चेला ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी थेट उत्तर दिले आहे.
जागावाटपाबाबत मुंबईत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान वसंत मोरे यांनी पुण्यात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचा ठाम दावा केला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक म्हणजे सुमारे १३० ते १३५ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यामुळे यावेळीही किमान ७० टक्के जागा शिवसेनेने लढवाव्यात, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
मनसे आणि शिवसेना दोन्ही पक्षांत काम करण्याचा अनुभव असल्याचे सांगत मोरे म्हणाले की, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे प्रभावी प्रचार करतील. मराठी माणसांच्या हितासाठी हा निर्णय महत्त्वाचा असून, युतीमुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
दोन्ही पक्षांची पुण्यात मजबूत ताकद असल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, मागील निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या मताधिक्याचा फायदा यावेळी होईल. त्यामुळे इतर पक्षांना या युतीची दखल घ्यावी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा   भाजपची उमेदवार यादी तीन टप्प्यांत ; बंडखोरी टाळण्यासाठी रणनीती