हडपसर–मांजरी रस्त्यावर भीषण अपघात

* २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, मित्र जखमी

पुणे :

हडपसर येथील महादेवनगर–मांजरी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. सिरम इन्स्टिट्यूटसमोरील पेट्रोल पंपाजवळ मांजरीकडून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
आदित्य बाळासाहेब शेळके (वय २०, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातात त्याचा मित्र मनोहर आण्णा रणसिंग (रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी मनोहरची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य आणि मनोहर हे दोघे सकाळी हडपसरकडून मांजरी मार्गे वाघोलीतील व्हर्टिव्ह एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे कामावर जात होते. सिरम कंपनीसमोरील पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर ते पुढे निघाले असता समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की आदित्यचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बस चालक माऊली अंभोरे (वय २३) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांजरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अवघ्या २० व्या वर्षी आदित्यचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हडपसर–मांजरी रस्त्यावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आणखी वाचा   महापालिका रणधुमाळीत भाजपचा आत्मविश्वास