* ९ महिन्यांत १९२ किलो अमली पदार्थ जप्त



पुणे :
पुणे सीमाशुल्क विभागाने एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत अमली पदार्थ, वन्यजीव व वन्यऔषधी तस्करीविरोधात केलेल्या व्यापक कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या कालावधीत तब्बल १९२ किलो हायड्रोपोनिक गांजा तसेच मौल्यवान वन्यजीव व वनस्पतींची तस्करी उघडकीस आणत सुमारे ६१ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे बँकॉकहून पुण्यात हायड्रोपोनिक गांजाची आंतरराष्ट्रीय तस्करी होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पुणे विमानतळावरील प्रवासी तपासणीदरम्यान ही तस्करी पकडण्यात सीमाशुल्क विभागाला यश आले.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कारवाई अधिक प्रभावी ठरली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ११८ किलो अमली पदार्थ (मूल्य ११.२१ कोटी रुपये) जप्त करण्यात आले होते. मात्र २०२५ मध्ये याच कालावधीत ही संख्या लक्षणीय वाढून ४३.६३ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. यामुळे देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
वन्यजीव तस्करीवरही कठोर चाप
अमली पदार्थांसोबतच सीमाशुल्क विभागाने दुर्मिळ वन्यजीव व वन्यऔषधींच्या तस्करीवरही कठोर कारवाई केली आहे. गेल्या नऊ महिन्यांत पुणे विमानतळावर झालेल्या तीन मोठ्या कारवायांत ११ कोटी १८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कतेमुळे पुण्यातून होणारी वन्यजीव तस्करी मोडीत काढण्यात आली आहे.
कारवाईचा लेखाजोखा (एप्रिल–डिसेंबर २०२५)
एकूण कारवाईचा आर्थिक आकडा : ६०.६५ कोटी रुपये
अमली पदार्थ जप्ती : १९२.५७ किलो (मूल्य ४३.६३ कोटी)
वन्यजीव व वन्यऔषधी तस्करी : ११.१८ कोटी
व्यावसायिक फसवणूक प्रकरणे : १२ प्रकरणांत २.३८ कोटींचा दंड वसूल
सीमाशुल्क महसूल जमा : ३.४६ कोटी रुपये
याबाबत माहिती देताना आयुक्त डी. अनिल यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय व केंद्रीय कायद्यांनुसार अमली पदार्थ तसेच फ्लोरा-फॉना तस्करी ही अत्यंत गंभीर बाब असून, अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात सीमाशुल्क विभागाची कठोर भूमिका कायम राहणार आहे.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त राहुल गावंडे यांनी स्पष्ट केले की, यंदा अमली पदार्थ तस्करीचे प्रमाण वाढले असले तरी सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात घटली आहे. चालू महिन्यात सोन्याच्या तस्करीची एकही घटना नोंदलेली नाही. पुणे विमानतळासह सी-पोर्टवरही सतत नजर ठेवून कारवाई करण्यात येत आहे.

















