पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी; भाजपकडून थेट ८० उमेदवारांना एबी फॉर्म, गणेश बिडकरांचा पहिला अर्ज दाखल 

पुणे :

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पक्षाने उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला निर्णायक वळण दिले आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून भाजपचे उमेदवार व निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी शहरातील पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा केला.

या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच आमदार हेमंत रासने उपस्थित होते. भाजपने पुण्यातील १०० जागांपैकी बहुसंख्य जागांवर उमेदवार निश्चित करत त्यापैकी ८० जणांना थेट एबी फॉर्म दिल्याची माहिती समोर आली आहे. अधिकृत यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म देत भाजपने निवडणूक रणनिती स्पष्ट केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक २३ मधून अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले विशाल धनवडे यांनाही एबी फॉर्म देण्यात आला असून ते देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे संबंधित प्रभागांतील लढती अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

आणखी वाचा   जुबैरचे थेट संबंध आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी