पुणे महापालिकेचा निवडणूक रणसंग्राम रंगणार

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

पुणे-

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर पुणे महापालिकेच्या राजकारणाला वेग आला आहे. आयोगाच्या घोषणेनुसार १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मुंबईसोबतच पुणे महापालिकेची निवडणूक ही राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी आणि प्रतिष्ठेची मानली जाते.

पुणे महापालिकेची मुदत १४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपली असून, आगामी निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार ठरवलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार आहे. त्यानुसार पुण्यात ४२ प्रभाग असतील आणि १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये चार सदस्यीय प्रभागांची रचना करण्यात आली असून, त्यापैकी ४० प्रभाग चार नगरसेवकांचे, तर प्रभाग क्रमांक ३८ हा पाच नगरसेवकांचा असणार आहे.

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मतदान केंद्रांची निश्चिती केली जात आहे. प्रत्येक ९०० मतदारांमागे एक मतदान केंद्र या निकषानुसार शहरात सुमारे ३ हजार ९४६ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणीकृत मतदारांनाच मतदानाचा अधिकार असेल. पुणे महापालिकेच्या हद्दीत एकूण ३५ लाख ५१ हजार ४६९ मतदार मतदान करणार असून, शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसह पुरंदर, शिरूर, भोर-वेल्हा या ग्रामीण भागातील काही मतदारांचाही यात समावेश आहे. आता निवडणूक रणधुमाळी सुरू झाल्याने पुणेकरांचे लक्ष उमेदवार, युती-आघाडी आणि विकासाच्या मुद्द्यांकडे लागले आहे.

आणखी वाचा   महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार