सात महिन्यांत ७५ हजार पुणेकरांना उच्च रक्तदाब; महापालिकेच्या तपासणीत धक्कादायक चित्र समोर 

पुणे :

शहरातील बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर स्पष्टपणे दिसू लागला असून, महापालिकेच्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळून आले आहेत. पुणे महानगरपालिकाच्या असंसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण अभियानाअंतर्गत गेल्या सात महिन्यांत ७५ हजार १४८ नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे निदान झाले आहे.

१ एप्रिल २०२५ ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ३० वर्षांवरील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली. शहरातील ३० वर्षांवरील एकूण लोकसंख्या १७ लाख ८९ हजार १५९ इतकी असून, त्यापैकी ८ लाख ३६ हजार नागरिकांची रक्तदाब तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी महापालिकेची १९ शहरी आरोग्य केंद्रे, ४५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच विविध दवाखान्यांचा उपयोग करण्यात आला.

मधुमेहाचेही वाढते प्रमाण

उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेहाचीही चिंताजनक स्थिती समोर आली आहे. या कालावधीत ७ लाख ६५ हजार ५१ नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४४ हजार १०१ जणांना मधुमेहाचे निदान झाले आहे. संशयित रुग्णांना पुढील तपासणी व उपचारासाठी शासकीय रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात येत आहे.

डिजिटल नोंदीमुळे उपचार सुलभ

तपासणी, निदान, उपचार आणि फॉलोअप यासाठी ‘एनसीडी पोर्टल’वर डिजिटल नोंदी करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांची माहिती तत्काळ उपलब्ध होत असून उपचार प्रक्रियेला वेग आला आहे.

तज्ज्ञांचा इशारा

सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले की, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि अयोग्य आहार या कारणांमुळे ३० वर्षांवरील वयोगटात उच्च रक्तदाबाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास हा आजार नियंत्रणात ठेवणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने नागरिकांना नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचे आणि संतुलित आहार व सक्रिय जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन केले आहे.

आणखी वाचा   विविध पक्षांतील नऊ माजी नगरसेवकांचा अजित पवार गटात प्रवेश