पुणे :



रेड लाइट परिसरातील कारवाईनंतर स्वाधारगृहात ठेवण्यात आलेल्या चार अल्पवयीन मुलींच्या सुटकेबाबत अद्याप निर्णय न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित मुलींचा देहविक्रय व्यवसायाशी किंवा बांगलादेशी तरुणींशी कोणताही संबंध नसतानाही त्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पुढील कार्यवाही ही बाल कल्याण समितीच्या आदेशावर अवलंबून असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
११ फेब्रुवारी रोजी फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी विशेष कारवाई करत बांगलादेशी तरुणींना जबरदस्तीने देहविक्रयास प्रवृत्त केल्याच्या संशयावरून छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान पूर्वी देहविक्रय व्यवसायात असलेल्या महिलांच्या कुटुंबातील चार अल्पवयीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्यांना स्वाधारगृहात हलविण्यात आले.
दरम्यान, संबंधित मुली शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली आहे. परिसरातील गणेशोत्सव मंडळे तसेच पोलिसांकडूनही त्यांच्या गुणांचे कौतुक करण्यात आले होते. मात्र, कारवाईनंतर त्यांना स्वाधारगृहात पाठविल्याने त्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
या प्रकरणी नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स इंडिया यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मुलींचे हक्क अबाधित राखत, पालकांकडून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य महिला आयोगाने पुणे पोलिस आयुक्त आणि फरासखाना पोलिस ठाण्यास पत्र पाठवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सांगितले की, “अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेच त्यांना स्वाधारगृहात ठेवण्यात आले आहे. सरकारमार्फत त्यांची योग्य काळजी घेतली जात असून बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.”
दरम्यान, मुलींच्या सुटकेबाबत ठोस निर्णय कधी होणार, याकडे संबंधित कुटुंबीयांसह सामाजिक संस्थांचे लक्ष लागले आहे.

















