पुणे :



शहरातील सहकारी बँकिंग व्यवस्थेला हादरा देणारा बनावट सोनेतारण कर्जप्रकरण समोर आले आहे. कल्याण जनता सहकारी बँक यांच्या वारजे व बिबवेवाडी शाखांमध्ये तब्बल ९१ लाख रुपयांचे कर्ज खोट्या दागिन्यांवर मंजूर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी तत्कालीन गोल्ड व्हॅल्युएटर अजित प्रभाकर कुलकर्णी यांच्यासह संबंधित कर्जदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ४२ जणांवर फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
कर्जप्रकरणांची फेरतपासणी
२६ ऑक्टोबर २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत ४१ कर्जप्रकरणांद्वारे हे व्यवहार झाले. कर्जदारांनी सोनेतारण कर्जासाठी अर्ज सादर करत दागिने तारण ठेवले होते. त्या वेळी दागिन्यांची शुद्धता व वजन तपासून प्रमाणित करण्याची जबाबदारी व्हॅल्युएटरकडे होती. प्रमाणपत्राच्या आधारे बँकेने ८.५ टक्के वार्षिक व्याजदराने एकूण ९१ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले.
सुरुवातीला काही प्रमाणात हप्ते आणि व्याज जमा झाले; मात्र त्यानंतर परतफेड थांबली. संबंधित खाती अनुत्पादक कर्ज (एनपीए) म्हणून घोषित करण्यात आली. यानंतर बँकेने संशयाच्या पार्श्वभूमीवर नव्याने नेमलेल्या व्हॅल्युएटरच्या उपस्थितीत सर्व तारण पाकिटांची सीसीटीव्ही चित्रीकरणासह फेरतपासणी केली.
बनावट दागिन्यांचा धक्कादायक खुलासा
फेरतपासणीत तारण ठेवलेले दागिने पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना कोणतेही बाजारमूल्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बँकेच्या उपव्यवस्थापकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानुसार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हॅल्युएटर फरार
दरम्यान, संबंधित व्हॅल्युएटर अजित कुलकर्णी यांचा मोबाइल बंद असून त्यांच्या घर व कार्यालयाला कुलूप आढळले आहे. ते फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून कर्जप्रस्ताव, तारण नोंदी, सीसीटीव्ही फुटेज तसेच संबंधितांच्या आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू आहे.
ठेवीदारांच्या सुरक्षेचा प्रश्न
सहकारी बँकांमध्ये सोनेतारण कर्ज ही तुलनेने सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. मात्र पडताळणी प्रक्रियेत त्रुटी किंवा संगनमत झाल्यास ठेवीदारांच्या पैशांवर थेट परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, दुहेरी पडताळणी, नियमित लेखापरीक्षण आणि तांत्रिक नियंत्रण व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

















