पुणे :



पुणे महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढलेले महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे पक्ष आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी नव्याने डाव मांडत आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांची युती होण्याची शक्यता बळावली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ पक्षांची आघाडी होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात महायुती विरुद्ध ‘राष्ट्रवादी’ आघाडी असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप–शिवसेना (शिंदे) यांच्यात युतीबाबत चर्चा झाली होती; मात्र स्थानिक पातळीवरील विरोधामुळे ती शक्य झाली नाही. आता मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीबाबत पहिली अधिकृत चर्चा झाल्याची माहिती आहे. पुणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेची स्वतंत्र ताकद तुलनेने मर्यादित असून, दोन्ही ‘राष्ट्रवादी’ गटांचे वर्चस्व अधिक आहे. त्यामुळे एकत्र येऊन निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत भाजप व शिवसेनेच्या गोटात व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात अनेक वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेचा कारभार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांवर सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळाल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. हा शहरी विजय ग्रामीण भागात उतरवून जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले असून, त्यासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाची साथ महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, भाजपने जिल्ह्यात बस्तान बसवण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप (पुरंदर) आणि संग्राम थोपटे (भोर) यांना पक्षात घेतले. मात्र नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांत त्यांचा अपेक्षित प्रभाव दिसून आला नाही. सासवड नगर परिषद वगळता बहुतांश ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले. दुसरीकडे पुरंदर, जुन्नर, खेड–आळंदी, चाकण, राजगुरुनगर या पट्ट्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद असून, त्याचा लाभ घेण्याच्या दृष्टीने भाजपने युतीचे प्रयत्न वेगाने सुरू केले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील अपयशानंतर ग्रामीण पुणे जिल्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी हालचाली वाढवल्या आहेत. अलीकडेच बारामती येथे शरद पवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र लढण्याबाबत झालेल्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे.
शरद पवार गटाने आघाडीची घोषणा केली असली, तरी अजित पवार यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा दिल्याची सावध भूमिका घेतली आहे. मात्र पुण्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना शरद पवार गटाचे नेते उपस्थित राहिल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन महायुतीतील भाजप–शिवसेना यांच्याशी दोन हात करण्याची शक्यता अधिक बळावली आहे. पुणे जिल्ह्यातील आगामी निवडणूक त्यामुळे राज्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरण्याची चिन्हे आहेत.

















