सात किलोमीटर आधीच सिग्नलची माहिती; ‘कवच 4.0’मुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित

पुणे :

रेल्वे प्रवास अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रगत तंत्रज्ञानावर आधारित ‘कवच 4.0’ ही स्वदेशी सुरक्षा प्रणाली देशातील प्रमुख मार्गांवर कार्यान्वित केली जात असून, पुणे विभागातही तिची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. या प्रणालीमुळे रेल्वे चालकाला तब्बल सात किलोमीटर आधीच पुढील सिग्नलची माहिती इंजिनमधील स्क्रीनवर मिळणार आहे. त्यामुळे गाडीचा वेग वाढवायचा की कमी करायचा, याचा निर्णय चालकाला वेळेत घेता येणार असून अपघातांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने १६ जुलै २०२४ रोजी ‘कवच 4.0’ प्रणालीस मान्यता दिली. यापूर्वी वापरात असलेल्या ‘कवच 2.0’मधील त्रुटी दूर करून ही सुधारित आवृत्ती विकसित करण्यात आली आहे. देशभरातील सुमारे १० हजार रेल्वे इंजिनमध्ये ही प्रणाली बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ९ हजार किलोमीटर मार्गावर तिची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे.
पुणे विभागातील सुमारे ७०० किलोमीटरच्या मार्गांपैकी २५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर ‘नॉन-सिग्नलिंग कवच’ची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. तसेच ८० हून अधिक रेल्वे इंजिनमध्ये ‘कवच 4.0’ बसविण्यात आले आहे. पुणे–कोल्हापूर आणि दौंड–मनमाड या मार्गांवर या प्रणालीची विशेष चाचणी घेण्यात आली.
अपघातांना आळा
सिग्नल तोडणे, समोरासमोर धडक किंवा मागून होणाऱ्या टक्कर यांसारख्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी ‘कवच’ प्रभावी ठरणार आहे. सिग्नल लाल असताना चालकाने चुकून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केल्यास प्रणाली आपोआप ब्रेक लावून गाडी थांबवेल. तसेच एकाच मार्गावर दोन गाड्या विरुद्ध दिशेने येत असतील किंवा एकमेकांच्या जवळ धावत असतील, तर तीन ते चार किलोमीटर आधीच स्वयंचलित ब्रेक लागतील.
वेग नियंत्रणात मदत
निर्धारित वेगमर्यादा ओलांडल्यास ‘कवच’ गाडीचा वेग नियंत्रित करेल. लूप लाइनवर जाताना वेग कमी न केल्यास प्रणाली आपोआप तो २० ते ३० किमी प्रतितासपर्यंत कमी करेल. रेल्वे फाटक उघडे असल्यास किंवा नागरी वस्तीजवळ हॉर्न वाजवला गेला नसेल, तरीही ‘कवच’ प्रणाली स्वयंचलितरीत्या आवश्यक ती कारवाई करेल.
‘कवच’ म्हणजे काय?
रेल्वे इंजिनमध्ये बसविण्यात येणारी टीसीएएस (ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम) ही ‘कवच’ची प्रमुख यंत्रणा आहे. स्थानकांवरील कम्युनिकेशन टॉवर आणि स्पॉट सिग्नलशी वायरलेसद्वारे जोडलेल्या या प्रणालीमुळे सिग्नलची माहिती थेट इंजिनमधील स्क्रीनवर उपलब्ध होते. त्यामुळे सहाय्यक चालकाला बाहेरील सिग्नलकडे सतत लक्ष ठेवण्याची गरज राहत नाही.
रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि वेगवान करण्यासाठी ‘कवच 4.0’ ही प्रणाली महत्त्वाची पायरी ठरत असून, उर्वरित मार्गांवरही तिची अंमलबजावणी लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

आणखी वाचा   भाजप मध्ये नगरसेवक पदाची स्पर्धा; नेत्यांच्या नातेवाईकांकडे लक्ष