* मतविभाजनाचा भाजपला मोठा फायदा, विरोधकांना फटका



पुणे –
पुणे महापालिका निवडणुकीत मतदारांनी यावेळी मोठ्या प्रमाणावर ‘नोटा’चा पर्याय निवडत राजकीय पक्षांविषयीचा असंतोष ठळकपणे व्यक्त केला आहे. मनसे आणि आम आदमी पार्टीपेक्षा अधिक मते ‘नोटा’ला मिळाल्याने ही बाब विशेष ठरली आहे. मतविभाजनाचा थेट फायदा भाजपला झाला असून, विरोधी पक्षांच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला आहे.
या निवडणुकीत मनसेला १ लाख ५५ हजार ७८८, तर पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या आम आदमी पार्टीला ५० हजार ५१७ मते मिळाली. मात्र ‘नोटा’ला तब्बल २ लाख २१ हजार २२२ मते मिळाली. २०१७ च्या पालिका निवडणुकीत नोटाला १ लाख ७१ हजार ५८१ मते होती. यावेळी त्यात सुमारे ४९ हजार ६४१ मतांची वाढ झाली आहे. एकूण मतदानाच्या जवळपास तीन टक्के मते ‘नोटा’ला मिळाल्याने मतदारांमधील नाराजी पुन्हा अधोरेखित झाली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने ११९ जागांवर विजय मिळवला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांना मिळून ३०, काँग्रेसला १५ आणि उद्धवसेनेला १ जागा मिळाली. मनसे, शिंदेसेना आणि आम आदमी पार्टीला एकही जागा मिळवता आली नाही. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे एका मतदाराला चार मते देण्याची संधी होती. त्यामुळे एकूण ७४ लाख ६३ हजार ८२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतविभाजनाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे २१, काँग्रेसचे ४, शिंदेसेनेचा १ आणि उद्धवसेनेच्या २ उमेदवारांना बसला. अनेक प्रभागांमध्ये मतांचे विभाजन झाल्याने भाजपच्या उमेदवारांना विजय मिळवणे सोपे झाले.
रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर, कोरेगाव पार्क–घोरपडी–मुंढवा, मांजरी बुद्रुक–केशवनगर–साडेसतरानळी, हडपसर–सातववाडी, मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क, नवी पेठ–पर्वती, जनता वसाहत–हिंगणे खुर्द, कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनी, सहकारनगर–पद्मावती, धनकवडी–कात्रज डेअरी, बालाजीनगर–आंबेगाव–कात्रज, अप्पर–सुपर इंदिरानगर या प्रभागांमध्ये भाजपला मतविभाजनाचा स्पष्ट फायदा झाला.
दरम्यान, ४१ प्रभागांपैकी फुलेनगर–नागपूर चाळ, येरवडा–गांधीनगर आणि कोंढवा खुर्द–कौसरबाग या तीन प्रभागांमध्ये भाजपला एकही जागा मिळाली नाही. १८ प्रभागांमध्ये भाजपचे पूर्ण पॅनेल विजयी झाले, तर उर्वरित प्रभागांमध्ये आंशिक यश मिळाले.
अपक्ष उमेदवारांच्या मतांमध्ये मोठी घट नोंदवली गेली आहे. २०१७ मध्ये अपक्षांना ३ लाख ३५ हजार ७१९ मते मिळाली होती, ती यावेळी १ लाख ४७ हजार २७८ वर घसरली. यामुळे अपक्षांना सुमारे १ लाख ८८ हजार मते कमी मिळाली आहेत.
एकूणच, पुणे महापालिका निवडणुकीत ‘नोटा’ला मिळालेली वाढती मते, अपक्ष व छोट्या पक्षांचे घटलेले मतदान आणि विरोधकांतील मतविभाजन यामुळे भाजपचा विजय अधिक भक्कम झाला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

















