महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

* पुण्यात १२ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुणे :

राज्यातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (दि. १५) मतदान होणार आहे. यानिमित्ताने प्रचाराच्या रणधुमाळीला आज पूर्णविराम मिळाला असून, मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तब्बल १२ हजारांहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, सर्व महत्त्वाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. शहरातील मतदान केंद्रांवर चारस्तरीय सुरक्षा रचना उभारण्यात आली असून, स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा आणि विशेष पथके सतर्क ठेवण्यात आली आहेत.

शहरात एकूण ३ हजार ९८३ मतदान केंद्रे असून, ही प्रक्रिया ९१३ इमारतींमध्ये पार पडणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कर्मचारी व होमगार्ड तैनात असणार असून, त्यांना स्थानिक पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त देण्यात आला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने पेट्रोलिंग केले जाणार आहे.

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहराचे ४५४ झोन करण्यात आले असून, त्या-त्या झोनमध्ये वरिष्ठ निरीक्षक व सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग होणार आहे. या सर्व कारवाईचा आढावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे.

९० संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त

पुणे शहरात ९० संवेदनशील मतदान केंद्रे ओळखण्यात आली असून, तेथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक अशा केंद्रावर एक अधिकारी व पाच पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासोबतच आठ क्यूआरटी पथके सतर्क ठेवण्यात आली असून, सहा अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी ५० पोलिस कर्मचाऱ्यांची स्ट्रायकिंग फोर्स तैनात राहणार आहे.

पोलीस आयुक्त व सहआयुक्त यांच्या देखरेखीखाली चार अपर पोलिस आयुक्त, १४ पोलिस उपायुक्त, सुमारे ७ हजार पोलिस अधिकारी-कर्मचारी, ३ हजार होमगार्ड आणि चार एसआरपीएफ कंपन्या बंदोबस्तासाठी कार्यरत असणार आहेत. तसेच चारचाकी वाहनांद्वारे ५०० पोलिस कर्मचाऱ्यांकडून सतत पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.

आणखी वाचा   स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजप–राष्ट्रवादी आमनेसामने; टिंगरे यांचा अर्ज मुदत संपल्यानंतर दाखल

महानगरपालिका निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी पुणे पोलिसांनी सज्जतेचा पूर्ण आढावा घेतला असून, कोणत्याही अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.