मतमोजणीची रणनिती ठरली

* सकाळी ११.३० वाजता पहिला निकाल अपेक्षित

पुणे :

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने अंतिम तयारी पूर्ण केली असून, मतमोजणीच्या वेळापत्रकासह महत्त्वाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. प्रभागांची संख्या, सदस्यसंख्या आणि मतदारसंख्या लक्षात घेऊन मतमोजणीच्या फेऱ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रभागांमध्ये निकाल लवकर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
१५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, १६ जानेवारी रोजी सकाळपासून मतमोजणी सुरू होईल. शहरातील एकूण ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये बहुतांश म्हणजे ४० प्रभाग चार सदस्यीय आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रत्येक मतमोजणी फेरीसाठी सुमारे ३० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. या गतीनुसार सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सर्वात कमी मतमोजणी फेऱ्या असलेल्या १३ प्रभागांचे निकाल सर्वप्रथम हाती येण्याची अपेक्षा आहे. बिबवेवाडी, कसबा-विश्रामबाग आणि कोंढवा-येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी १२ फेऱ्या असल्याने येथील राजकीय चित्र लवकर स्पष्ट होईल. दुसरीकडे, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक २० फेऱ्या होणार असून, येथे मतमोजणीसाठी अधिक वेळ लागणार आहे. पाच सदस्यीय प्रभाग असल्यामुळे ही प्रक्रिया तुलनेने संथ गतीने पूर्ण होणार आहे.
प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज परिसरात दहा फेऱ्या होणार असल्याने या भागातील निकाल दुपारनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. एकूणच मतमोजणीची प्रक्रिया दुपारपर्यंत म्हणजेच साधारण ३.३० ते ४.०० वाजेपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले की, मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जाणार असून, सर्व निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणेकरांना निवडणूक निकालांसाठी फारशी प्रतीक्षा करावी लागणार नाही.

आणखी वाचा   उच्च जोखीम गर्भवतींसाठी ‘ॲनॉमली स्कॅन’ सक्तीचे