पुणे :



राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सलग चार दिवस दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक नुकतेच निर्गमित करण्यात आले असून, संबंधित कालावधीत दारूची दुकाने, बार आणि परमिट रूम बंद राहणार आहेत.
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. डिसेंबर २०२५ मध्ये नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका पार पडल्या असून, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, सर्वच प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर दौरे करत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांवर केंद्रित असल्याचे चित्र आहे.

















