* इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली



पुणे :
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर न झाल्याने राजकीय वातावरणात अनिश्चितता निर्माण झाली आहे. निवडणुकीची घोषणा आज-उद्या होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी प्रत्यक्षात तारखा न जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये तीव्र अस्वस्थता दिसून येत आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अनेक इच्छुकांनी गावोगावी संपर्क दौरे, बैठका, कार्यकर्त्यांचे जाळे उभारणे तसेच मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. काही उमेदवारांनी प्रचार साहित्य, वाहन व्यवस्था आणि कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेला विलंब होत असल्याने हा खर्च व मेहनत वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्यात सध्या ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपूनही अद्याप निवडणुका न झाल्याने प्रशासकीय राजवट कायम आहे. दरम्यान, २० जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत ८८ पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक असल्याने त्या ठिकाणच्या निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारी रोजी होणार असून, त्यानंतर निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे. मात्र, आरक्षणाचा अडथळा नसलेल्या १२ जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे कायदेशीर अडथळे नसलेल्या जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पहिल्या टप्प्यातील संभाव्य जिल्हे
पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये मतदार यादी अद्ययावत करणे, प्रशासकीय तयारी आणि आचारसंहिता लागू करण्याचे प्राथमिक नियोजन पूर्णत्वास येत असल्याचे संकेत मिळत आहेत.
















