* एक मत दिले तरी मतदान वैध



पुणे :
महानगरपालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मतदारांनी चारही मते देणे आवश्यक आहे का, कमी मते दिल्यास मतदान बाद होईल का, अशा शंका उपस्थित होत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडत मतदारांचा संभ्रम दूर केला आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मतदाराने चारऐवजी एक, दोन किंवा तीन मते दिली तरीही ती सर्व मते वैध राहणार आहेत. चारही मते देणे बंधनकारक नसून, कमी मते दिल्यामुळे मतदान अवैध ठरणार नाही. मात्र लोकशाही प्रक्रियेत अधिक प्रभावी सहभागासाठी नागरिकांनी शक्य तितकी सर्व मते वापरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाच्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकूण ४१ प्रभागांची रचना करण्यात आली आहे. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय असून एका प्रभागातून पाच नगरसेवक निवडले जाणार आहेत. या माध्यमातून एकूण १६५ नगरसेवकांची निवड होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रचाराला जोर चढला असून शहरात सभा, रॅल्या आणि जनसंपर्क कार्यक्रम रंगात आले आहेत.
दरम्यान, काही मतदारांमध्ये दोन-तीनच मते दिल्यास उरलेली मते ‘नोटा’कडे जातील का, अशी शंका होती. मात्र नियमांनुसार, मतदाराने जाणीवपूर्वक ‘नोटा’चा पर्याय निवडल्याशिवाय मत तिकडे जाणार नाही. प्रत्येक उमेदवार गटाच्या यादीच्या शेवटी ‘नोटा’चा स्वतंत्र पर्याय उपलब्ध असून, किती उमेदवारांना मतदान करायचे किंवा ‘नोटा’ कुठे वापरायचा, याचा पूर्ण अधिकार मतदारालाच आहे.
मतदान १५ जानेवारी रोजी होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत सर्व मते देणे बंधनकारक नसले तरी, नागरिकांनी अधिकाधिक मतदान करून लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

















