गुन्हेगारी उमेदवारी’वरून राजकीय युद्ध पेटले

पुणे :

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण अधिक तापले असून, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका सुरू झाली आहे. एकीकडे शहरात वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली जात असताना, दुसरीकडे राजकीय पक्षच अशा पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी देत असल्याचा आरोप केला जात आहे.
या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट शाब्दिक संघर्ष पाहायला मिळत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप समोरासमोर असल्याने दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकेची संधी सोडत नाहीत.
भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादीवर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवारांनी भाजपवरच बोट दाखवत, “शहरात गुन्हेगारीमुक्त पुण्याची भाषा केली जाते, मात्र पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत उमेदवारांची यादी पाहिली तर हे कोणत्या तत्वात बसते?” असा सवाल उपस्थित केला. काही कुख्यात गुंडांच्या घरातून उमेदवारी देण्यात आल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.
याचबरोबर, गेल्या काही वर्षांत पुण्यात ‘अर्बन स्ट्रीट’सारख्या विकासकामांच्या नावाखाली रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमण आणि हफ्तेखोरी वाढल्याचा आरोप करत अजित पवारांनी भाजपवर गंभीर टीका केली. “टेंडरमध्ये रिंग, दादागिरी होते. मी पुरावे देऊन बोलेन, बिनबुडाचे आरोप करणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
नाव न घेता एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला परदेशात जाण्यास मदत कशी झाली, पासपोर्ट कसा मिळाला आणि तो कसा फरार झाला, याची चौकशी करण्याची मागणी करत पवारांनी भाजपवर अप्रत्यक्ष आरोप केले. तसेच, “दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जनतेसमोर ठेवा, सगळं चित्र स्पष्ट होईल,” असे आव्हानही त्यांनी दिले.
दरम्यान, काही नेत्यांच्या नातेवाइकांवर गुन्हे दाखल असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “फक्त गुन्हे दाखल झाले म्हणजे दोष सिद्ध झाला असं नाही. माझ्यावरही हजारो कोटींचे आरोप झाले होते, पण आरोप म्हणजे गुन्हेगारी ठरत नाही,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा वाद आता थेट राजकीय विश्वासार्हतेच्या मुद्द्यावर येऊन ठेपला असून, मतदार कोणाच्या भूमिकेला पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा   राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित सुमारे ८० हजार शाळा आज बंद