राष्ट्रवादी काँग्रेस एकाकी, राजकीय समीकरणांना नवं वळण

पुणे :

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तीव्र राजकीय हालचालींना शुक्रवारी रात्री निर्णायक वळण मिळाले. अनेक दिवस चाललेल्या चर्चांनंतर महाविकास आघाडी (मविआ) एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले. याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी मावळल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला सहभागी करून घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. संयुक्त बैठकांमध्ये जागावाटपाचे प्राथमिक सूत्रही ठरले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या निर्णयाला विरोध करत पदाचा व पक्षाचा राजीनामा दिल्याने राजकीय वातावरण तापले. त्यानंतर काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीतही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर न जाण्याचा स्पष्ट निर्णय घेण्यात आला.
या घडामोडींमुळे मविआत फूट पडणार की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, यावर दिवसभर तर्कवितर्क सुरू होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी सकाळी स्वतंत्र बैठक घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत जागावाटप व चिन्हाबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘घड्याळ’ चिन्हाचा आग्रह धरण्यात आल्याची चर्चा असून, त्याला नकार मिळाल्यानंतर शरदचंद्र पवार पक्षाची पुन्हा स्वतंत्र बैठक झाली.
दिवसभराच्या घडामोडीनंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीबरोबरच कायम राहण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

आणखी वाचा   नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा लोकसभेत; सुप्रिया सुळे यांचा प्रश्न, गडकरींचे एका वर्षात काम पूर्ण करण्याचे आश्वासन