जागावाटपावरून महायुतीत ठिणगी

* पुणे महापालिकेत शिवसेना-भाजप संघर्ष तीव्र

पुणे :

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील जागावाटपाचा वाद चिघळला आहे. अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्याने शिवसेनेत असंतोष वाढला असून, मागण्या मान्य न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.
भाजपकडून शिवसेनेला सुरुवातीला अवघ्या १२ जागांची ऑफर देण्यात आली होती. नंतर हा प्रस्ताव वाढवून १५ जागांपर्यंत नेण्यात आला. मात्र शिवसेनेची किमान ३५ ते ४५ जागांची ठाम मागणी आहे. हा प्रस्ताव सन्मानजनक नसल्याची भावना पक्षात असून, युती कायम ठेवायची की स्वतंत्र लढत द्यायची, यावर आता निर्णायक टप्पा आला आहे.
२९ जानेवारीला स्वबळाची घोषणा?
शिवसेनेच्या उपनेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत भाजपच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जागावाटपावर तोडगा न निघाल्यास २९ जानेवारीला स्वतंत्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका ज्येष्ठ शिवसेना नेत्याने सांगितले की, आमचे प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास सक्षम उमेदवारांना फॉर्म देऊन स्वबळावर निवडणूक लढवू.

आणखी वाचा   डेक्कन परिसरात महापालिकेचा धडक मोर्चा : पाच ट्रकभर साहित्य जप्त, पदपथ मोकळे