झेडपी–पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल? 

* चार ते आठ दिवसांत घोषणा, महिनाअखेरीस मतदानाची शक्यता

पुणे –

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत दीर्घकाळापासून सुरू असलेली प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. महायुती सरकारमधील मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी येत्या चार ते आठ दिवसांत जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली असून, त्यामुळे राज्यातील ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.
राज्यात पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आरक्षणाच्या गुंतागुंतीमुळे दुसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. त्यानंतर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यात येणार असून, याच टप्प्याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावतीसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुका अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.
मंचर येथील शेवाळवाडी येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकांबाबत महत्त्वाचे संकेत दिले. यापूर्वी नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा अचूक सांगणारे वळसे-पाटील यांचा हा अंदाज महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग डिसेंबरअखेर पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल, अशी चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्जांसाठी सात दिवसांची मुदत दिली जाणार असून, त्यानंतर दोन दिवस अर्ज मागे घेण्याची संधी असेल. छाननीनंतर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाईल. जानेवारीच्या अखेरीस, २८ किंवा २९ जानेवारी रोजी मतदान व निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता असून, ३१ जानेवारीपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

आणखी वाचा   भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांचा प्रश्न; माजी नगरसेवकांना प्राधान्य, कार्यकर्त्यांची नाराजी