पुणे-



पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) पदाचा गैरवापर करत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे आणि आर्थिक तडजोडीसाठी मध्यस्थामार्फत वसुली केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस फौजदार प्रवीण घाडगे यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करत सेवेतून बडतर्फीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांचे नाव वापरून सहायक पोलीस आयुक्तांना फोन करत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली. आंदेकर टोळीशी संबंधित एका बिल्डरच्या जमिनीच्या वादप्रकरणात मदत मिळावी, यासाठी दबाव टाकण्यात आला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्याने कोणतीही मदत करण्यास स्पष्ट नकार देत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची माहिती दिली.
त्यानंतर झालेल्या चौकशीत ‘स्टेनली’ नावाचा व्यक्ती मध्यस्थ म्हणून कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. तो थेट घाडगे यांच्या संपर्कात असून प्रकरण मिटवण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी झाल्याची कबुली त्याने दिली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने या मध्यस्थाला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.

















