बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक राजधानीचे वैभव

*५८ व्या वर्धापन दिनी उल्हास पवार यांचे गौरवोद्गार

पुणे :

बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराचे वैभव आहे. महाराष्ट्राचे लाडके हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारणी झालेल्या बालगंधर्व रंगमंदिर आता केवळ शहराच्या अथवा महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत, रसिकाग्रणी उल्हास पवार यांनी काढले. 

बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीने अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या  बालगंधर्व महोत्सवाचे अध्यक्षस्थानावरून उल्हास पवार बोलत होते. 

यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ संजय चोरडिया, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे,अभिनेते सुशांत शेलार,अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अशोककुमार सराफ,बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,अलविरा मोशन एंटरटेन्मेंटच्या दिपाली कांबळे,ॲड. मंदार जोशी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमात ‘मेलडी मेकर्स’च्या माध्यमातून सिने संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अशोककुमार सराफ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे पद्मश्री रघुवीर खेडेकर, जेष्ठ पत्रकार विद्याधर कुलकर्णी, सागर आव्हाड, विजय जगताप,राज देशमुख, गायिका सावनी दातार कुलकर्णी,अलविरा झरेकर, चित्रपट निर्माते दत्ता दळवी, मंगेश मोरे, डॉ. गौरव घोडे, लोककलावंत, लेखक व दंतचिकित्सक आशुतोष जावडेकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. 

बालगंधर्व रंगमंदिराच्या भूमिपूजन आणि उद्घाटन या दोन्ही ऐतिहासिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी आपल्याला प्राप्त झाल्याची आठवण उल्हास पवार यांनी यावेळी सांगितली. शास्त्रीय संगीत, नाटक, लोककला अशा सर्व कलाप्रकारांना बालगंधर्व रंगमंदिराच्या माध्यमातून न्याय मिळाल्याचे उल्हास पवार यांनी नमूद केले. कोणत्याही कला प्रकारांमध्ये श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असे काही असत नाही. नाट्यसंगीत हा शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, दादरा, ठुमरी या प्रकारांचा सुरेल संगम असल्याचे त्यांनी नमूद केले. ऋषितुल्य गायक पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, सुधीर फडके अशा कलाकारांच्या स्वर्गीय सादरीकरणाचा साक्षीदार बालगंधर्व रंगमंदिर असल्याचे त्यांनी नमूद केले. 

आणखी वाचा   पुण्यात उबाठाला मोठे खिंडार