पुणे :



आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेसाठी करण्यात आलेल्या रस्ते सुशोभीकरण आणि डांबरीकरणाच्या कामांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुणे महानगरपालिका प्रशासनाने तब्बल १४५ कोटी रुपये खर्च करून ७५ किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरण, पॅचवर्क दुरुस्ती आणि चेंबर समपातळीत आणण्याची कामे केली होती. मात्र स्पर्धेला अवघा महिना उलटत नाही तोच काही ठिकाणी चेंबर खचू लागल्याचे समोर आले आहे.
जानेवारी महिन्यात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या ‘पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेसाठी शहरातील प्रमुख मार्गांची झपाट्याने दुरुस्ती करण्यात आली होती. रस्त्यांवरील खड्डे, उंचसखल भाग, जुनाट पॅचवर्क दूर करून नव्या डांबराचा थर देण्यात आला. पांढरे पट्टे, झेब्रा क्रॉसिंग, रंगवलेले पादचारी मार्ग आणि दुभाजकांमुळे रस्त्यांना आकर्षक रूप प्राप्त झाले. या कामांचे प्रारंभी नागरिकांनी स्वागत करत प्रशासनाचे कौतुकही केले.
मात्र आता काही मार्गांवरील चेंबर खाली बसल्याने वाहनचालकांसमोर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे चेंबर उचलणे आणि समपातळीत आणणे या कामांसाठी सुमारे १५ कोटी रुपये विनानिविदा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहेत.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दीपक वाघमारे आणि विवेक वेलणकर यांनी महापालिकेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सायकल स्पर्धेच्या निमित्ताने घाईघाईत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित ठेकेदारावर चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ज्या ठिकाणी चेंबर खचले आहेत, तेथे संबंधित ठेकेदाराकडूनच दुरुस्ती करून घेतली जाईल, असे स्पष्ट केले. भविष्यात शहरातील सुमारे १५०० चेंबर दुरुस्त करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र सध्याच्या कामांच्या चौकशीबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
महापालिकेने कोट्यवधींचा खर्च करून उभारलेली रस्त्यांची ‘चमक’ अल्पावधीतच मलिन होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आता प्रशासन ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करून दर्जेदार कामाची हमी देणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

















