पवार यांना पुढील ४८ तासांत डिस्चार्जची शक्यता

पुणे :

ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून पुढील ४८ तासांत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. डीहायड्रेशनच्या त्रासामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. परवेझ यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पवार यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती समाधानकारक आहे. रक्ततपासणी व सिटीस्कॅनसह सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल सामान्य आले आहेत. उलट्यांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण घटल्याने त्यांना डीहायड्रेशनचा त्रास झाला होता, मात्र उपचारांनंतर प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

त्यांनी नियमित आहार घेतला असून ते विश्रांती घेत आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही,” असे डॉ. परवेझ यांनी स्पष्ट केले. पुढील ४८ तास वैद्यकीय देखरेखीखाली ठेवून त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मागील आठवड्यातही पवार यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते; मात्र पुन्हा अशक्तपणा जाणवल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत सकारात्मक संकेत मिळत असून लवकरच ते नियमित दिनक्रमाला सुरुवात करतील, अशी माहिती जवळच्या सूत्रांनी दिली.

आणखी वाचा   ६० वर्षांचा लेखाजोखा द्या; भाजपच्या काळातच पुण्याचा वेगवान विकास