हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो चाचणी यशस्वी

पुणे :

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे एप्रिल २०२६ अखेरपर्यंत हा मार्ग टप्प्याटप्प्याने प्रवाशांसाठी खुला होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हिंजवडी आयटी पार्ककडे दररोज मोठ्या संख्येने कर्मचारी प्रवास करतात. या मार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी लक्षात घेता मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. वेळेची लक्षणीय बचत होणार असून आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्राधिकरणाने मेट्रोची दोन्ही दिशांनी यशस्वी चाचणी घेतली आहे. प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के स्थापत्य काम पूर्ण झाले असून व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे परवानगी मागण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सर्व स्थानके एकाच वेळी सुरू न करता ज्या स्थानकांचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे, ती प्रथम प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. उर्वरित स्थानके टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून हिंजवडी–शिवाजीनगर दरम्यानचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे.

आणखी वाचा   काळवीटांचा एनडीए रोडवर मुक्तपणे संचार