पुणे–कोल्हापूर महामार्गाला वेग; प्रवास अवघ्या तीन तासांत! जून २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

पुणे :

पुणेकर आणि कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्या नियंत्रणाखालील पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच-४८) विस्तारीकरण व सुधारणा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून, काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते कोल्हापूर हा प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण होणार आहे. सध्या चार ते साडेचार तास लागणारा प्रवास यामुळे सुलभ आणि वेगवान होणार आहे.
चार आणि सहा पदरीकरणासह मोठ्या सुधारणा
पुणे–सातारा–कराड–कोल्हापूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. कोल्हापूरच्या पेठ नाका ते सातारा आणि सातारा ते पुणे या दरम्यान रस्ता चार व सहा पदरी करण्यात येत आहे. विविध ठिकाणी उड्डाणपूल, भूमिगत मार्ग तसेच अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’वर सुधारणा करण्यात येत आहेत.
खंबाटकी घाटात नव्याने बांधण्यात आलेल्या बोगद्यामुळे घाटातील वाहतूक अधिक सुरक्षित झाली आहे. सध्या एका दिशेने वाहतूक सुरू असून, उर्वरित काम पूर्ण झाल्यावर दोन्ही बाजूंनी सुरळीत वाहतूक होणार आहे.
खासगी कंपन्यांची सहभागिता
पेठ नाका ते कराड (२७ कि.मी.) या टप्प्याचे काम करण्यात येत आहे. तर पेठ नाका ते कोल्हापूर (४५ कि.मी.) या भागाची जबाबदारी रोड वे स्लूशन इंडिया इन्फ्रारा लिमिटेड यांच्याकडे आहे. कराड येथील उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पाला गती मिळाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार काही ठिकाणी अतिरिक्त भूमिगत मार्गांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
जून २०२६ पर्यंत पूर्णत्वाचा निर्धार
महामार्गावरील बहुतांश कामे अंतिम टप्प्यात असून जून २०२६ पर्यंत सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असली तरी काम पूर्ण झाल्यावर दोन्ही दिशांना सहा पदरी मार्ग उपलब्ध होणार आहे.
वेळ, इंधन आणि सुरक्षिततेत मोठा लाभ
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे–कोल्हापूर दरम्यानचा प्रवास सुमारे एक ते दीड तासांनी कमी होणार आहे. खेड शिवापूर, शिवरे, हरिश्चंद्रगड परिसर आणि वेळे या अपघातप्रवण भागांमध्ये सुधारणा झाल्याने अपघातांचे प्रमाण घटण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय रहदारीची कोंडी कमी होऊन इंधनाची बचत होईल. पर्यावरणीय प्रदूषणात घट होण्यास मदत होईल. व्यापारी, उद्योगपती तसेच दैनंदिन प्रवाशांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना
महामार्ग पूर्णत्वास गेल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. पुणे–कोल्हापूर दरम्यानचा दळणवळण सुलभ झाल्याने व्यापार वाढीस लागेल आणि आर्थिक घडामोडींना वेग येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी वाचा   सराईत गुन्हेगाराकडून तीन पिस्तुले व १२ जिवंत काडतुसे जप्त