आचार्य आनंदऋषीजी चौकातील दुमजली उड्डाणपूल सज्ज

* पुढील महिन्यात वाहतुकीसाठी खुला

पुणे :

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात उभारलेला दुमजली उड्डाणपूल अंतिम टप्प्यात आला आहे. मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. ती पूर्ण करून पुढील महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सेनापती बापट रस्त्यासह गणेशखिंड परिसरातील दीर्घकालीन वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग आणि गणेशखिंड–सेनापती बापट रस्त्यावरून बाणेर, पाषाण व औंधकडे जाणाऱ्या वाहनांच्या सुरळीत प्रवासासाठी या दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. गणेशखिंड रस्त्यावरील ई-स्क्वेअर परिसरात तसेच बाणेरकडील उतरणीच्या ठिकाणी बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र बाणेर आणि पाषाण दिशेने जाणाऱ्या रॅम्पचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी दिली.
दरम्यान, माण ते पुणे विद्यापीठ चौकादरम्यान मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. आगामी दोन ते तीन महिन्यांत शिवाजीनगरपर्यंत मेट्रोची चाचणी होणार असून, याच वर्षात दुमजली उड्डाणपुलाच्या वरच्या मार्गावरून मेट्रो धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाणेर, पाषाण आणि औंध परिसरातील नागरिकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
उड्डाणपूल प्रकल्प – ठळक बाबी
१४ जुलै २०२० रोजी जुना उड्डाणपूल पाडण्यात आला
२५ नोव्हेंबर २०२१ रोजी टाटा कंपनीसोबत मेट्रो व उड्डाणपूल कामाचा करार
मेट्रो प्रकल्पासाठी ३६ महिन्यांची मुदत
परवानग्यांतील विलंबामुळे ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात
उड्डाणपुलाचे बहुतांश काम पूर्ण
अंदाजित खर्च सुमारे २५० कोटी रुपये
फेब्रुवारीअखेर पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता

आणखी वाचा   नवी मुंबई विमानतळाचा परिणाम, पुणे–मुंबई हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला