पुणे :



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे येत्या मंगळवार (दि. २०) पासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व विभागीय मंडळांतील माध्यमिक शाळांना ही प्रवेशपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहेत.
मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून शाळांनी प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत. प्रवेशपत्र छापताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. प्रिंट केलेल्या प्रवेशपत्रावर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करणे बंधनकारक राहणार आहे.
प्रवेशपत्रावरील नाव, आईचे नाव, जन्मतारीख किंवा जन्मठिकाण यासंबंधी दुरुस्त्या ऑनलाइन पद्धतीने करता येतील. मात्र विषय किंवा माध्यम बदल असल्यास शाळांनी प्रचलित कार्यपद्धतीनुसार विभागीय मंडळाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. फोटो सदोष असल्यास विद्यार्थ्याचा फोटो प्रवेशपत्रावर चिकटवून त्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व शिक्का आवश्यक राहील.
प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित शाळांनी पुन्हा एकदा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत’ असा स्पष्ट शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून द्यावे, असेही राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.

















