पुणे :



महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय हालचालींना वेग आला असतानाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या सहभागामुळे पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (खरात गट) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोथरूड मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
गजा मारणे याच्यावर यापूर्वी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली असून, सध्या तो तडीपार आहे. न्यायालयाने ठराविक अटींवर जामीन मंजूर केला असला तरी, शहरात प्रवेशास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. पत्नीच्या निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मारणे याने पुण्यात येण्याची परवानगी मागितली होती; मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे.
दरम्यान, गजा मारणे याने दूरध्वनीद्वारे विविध व्यक्तींशी संपर्क साधत प्रचारावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तडीपार असतानाही अशा प्रकारची हालचाल झाल्याने पुणे पोलिसांनी तत्काळ दखल घेत स्वतंत्र पथक त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, महापालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार तसेच त्यांच्या नातेवाइकांच्या हालचालींवर विशेष नजर ठेवण्यात येत असून, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आवश्यक ती कडक कारवाई करण्यात येईल.

















