पुणे :



महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षांतर्गत नाराजी उफाळून येताना दिसत आहे. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या अनेक इच्छुकांनी पक्षशिस्त झुगारून देत थेट अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या वाढत्या अपक्ष लढतीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र उमेदवारांसाठी तब्बल १९१ मुक्त चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत. या चिन्हांमध्ये घरगुती वापरातील वस्तू, फळे, भाज्या तसेच दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक प्रतिकांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षांसाठी ठराविक चिन्हे राखीव ठेवण्यात आली असून ती चिन्हे इतरांना दिली जाणार नाहीत.
अपक्ष उमेदवारांना अर्ज सादर करतानाच मुक्त चिन्हांच्या यादीतून आपल्या पसंतीची तीन चिन्हे नमूद करावी लागणार आहेत. या पसंतीनुसार ३ जानेवारी रोजी चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, एकाच चिन्हासाठी अनेक उमेदवारांनी मागणी केल्यास सोडत पद्धतीने अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
मतदारांपर्यंत स्वतःची ओळख पोहोचवणे हे अपक्ष उमेदवारांसाठी मोठे आव्हान मानले जाते. त्यामुळे सहज लक्षात राहतील, रोज दिसणाऱ्या वस्तूंशी निगडित चिन्हांकडे उमेदवारांचा कल वाढलेला आहे. टीव्ही, रिक्षा, किल्ली, कंगवा, बॅट, लॅपटॉप, फुटबॉल, टेबल, दुर्बीण अशी चिन्हे अधिक मागणीची ठरत आहेत.
याशिवाय सफरचंद, नारळ, ऊस, कलिंगड, द्राक्ष, फणस, भेंडी, मका, भुईमूग, बिस्कीट, पाव, केक तसेच जेवणाची थाळी यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण चिन्हेही मुक्त यादीत समाविष्ट आहेत. अपक्षांसह अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवारही याच चिन्हांमधून निवड करू शकणार आहेत.
संपूर्ण चिन्हवाटपाची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पारदर्शकपणे राबवली जाणार असून, मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार मात्र त्यांच्या राखीव चिन्हांवरच निवडणूक लढवतील. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक अपक्षांच्या वाढत्या प्रभावामुळे अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

















