कडक पोलिस बंदोबस्तात आंदेकर कुटुंबाचे उमेदवारी अर्ज दाखल

* ‘देखेगा काम, आंदेकर का नाम’, ‘आंदेकरला मत म्हणजे विकासाला मत

* बंडू आंदेकरची घोषणाबाजी

पुणे :

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आंदेकर कुटुंबाने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्याची पत्नी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी न्यायालयाच्या सशर्त परवानगीने अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला असून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात कडेकोट पोलिस बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पडत आहे.

आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत असला तरी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी न्यायालयाने त्याला, तसेच लक्ष्मी उदयकांत आंदेकर व सोनाली वनराज आंदेकर यांना सशर्त मुभा दिली आहे. या परवानगीअंतर्गत कोणतीही मिरवणूक, भाषण अथवा घोषणाबाजी करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया पोलिसांच्या निगराणीत पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशांच्या पार्श्वभूमीवर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय परिसरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींना कोल्हापूर कारागृहातून थेट पुण्यात आणण्यात आले असून त्यांनी प्रथम कार्यालयात हजेरी लावून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, बंडू आंदेकर यालाही पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्यासाठी आणण्यात आले असल्याची माहिती आहे. यावेळी त्यांने नेकि का काम आंदेकर का नाम अशी घोषणाबाजी केली. उपलब्ध माहितीनुसार, बंडू आंदेकर प्रभाग क्रमांक २२ मधून, तर लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर प्रभाग क्रमांक २३ मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे भवानी पेठ परिसरात राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे. तसेच यांना अजीत पवार गट राष्ट्रवादी द्वारे तिकीट दिले असल्याची सुत्रांची माहिती आहे. 

तोंडाला बुरखा, हातात दोर बांधलेला

यावेळी बंडू आंदेकरच्या तोंडाला बुरखा, हातात दोर बांधलेला दिसला. ‘देखेगा काम, आंदेकर का नाम’, ‘आंदेकरला मत म्हणजे विकासाला मत’, अशा घोषणा त्याने यावेळी दिल्या. तसेच ‘मला लोकशाहीमध्ये कशापद्धतीने आणले आहे,’ असे त्याने म्हंटले आहे.

आणखी वाचा   भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’